महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची 'पुकार'?

Lok Sabha Election 2024: गेल्या अनेक महिन्यांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतली 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपामध्ये प्रवेश करणार आणि मुंबईतून भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगल्या आहेत. (North Central Mumbai Constituency) फक्त मुंबईतून कुठल्या मतदार संघातून माधुरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर प्रश्नचिन्ह होतं. परंतु आता उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात माधुरी दीक्षितचे बॅनर झळकल्याने आता ती या मतदार संघातील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागेवरच निवडणूक लढवणार असे संकेत मिळत आहेत.

Lok Sabha Election 2024
माधुरी दीक्षित

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 4:08 PM IST

मुंबईLok Sabha Election 2024:हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या लावण्य, अभिनय आणि नृत्याची छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणून चाहत्यांना तिच्याबद्दल कोण कौतुक वाटतं! अभिनयाबरोबरच चित्रपटनिर्मितीच्या प्रांतात यश मिळवल्यानंतर माधुरी दीक्षितला आता राजकारणाचं क्षेत्र खुणावत असल्याची चर्चा आहे. माधुरी दीक्षित भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उत्तम संपर्कात असते. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत माधुरी दीक्षित हिच्या घरी भेट दिली होती. (MP Poonam Mahajan) याप्रसंगी मोदी सरकारने केलेल्या कामाचं बुकलेटसुद्धा अमित शाह यांनी तिला भेट दिलं होतं. या भेटीनंतरच माधुरी दीक्षित ही भाजपामध्ये प्रवेश करणार या चर्चांना अधिक बळ मिळालं. अशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनमानसात प्रसिद्ध चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस असल्यानं माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता जोर धरू लागली आहे. तूर्त तरी या विषयावर माधुरीनं कुठलंही भाष्य केलेलं नाही.


पुन्हा का रंगली चर्चा?भाजपाचे ज्येष्ठ नेता दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांचा उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदार संघ. या लोकसभा मतदार संघातून त्या २०१४ व २०१९ अशा सलग दोनदा विजयी झाल्या आहेत. याच मतदार संघात आता साई उत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. महत्त्वाचं म्हणजे माधुरी दीक्षित हिचे बॅनर किंवा फ्लेक्स हे पहिल्यांदाच या मतदार संघात सार्वजनिक ठिकाणी लावले गेले आहेत. वास्तविक ही बॅनरबाजी जरी धार्मिक कार्यक्रमाची असली तरी या निमित्ताने माधुरी दीक्षित हिला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल तर नव्हे? निवडणुकीत उतरवण्याची तयारी आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.


उत्तर मुंबई की उत्तर मध्य मुंबई?मुंबईतील एकूण ६ लोकसभा मतदार संघांपैकी उत्तर मुंबई व उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ भाजपासाठी अतिशय सुरक्षित मतदार संघ म्हणून ओळखले जातात. यापैकी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा दिवंगत भाजप नेता प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात एकूण सहा आमदार असून विलेपार्ले, वांद्रे पश्चिम या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. तर चांदिवली आणि कुर्ला या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार असून वांद्रे पूर्व या मतदारसंघात झिशान सिद्दिकी हे काँग्रेसचे आमदार आहे. कलिना या मतदारसंघात संजय पोतनीस हे शिवसेना, ठाकरे गटाचे आमदार आहेत. तसं पाहिलं तर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि शिंदे गटाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या मतदारसंघातून पूनम महाजन या सलग दोनवेळा विजयी झाल्या आहेत. म्हणून सध्याच्या घडीला हा मतदारसंघ भाजपला अनुकूल मानला जातो.

माधुरीसाठी भाजपा धक्कातंत्र वापरणार का?दुसरा मतदार संघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ आहे. या मतदार संघातूनसुद्धा खासदार गोपाल शेट्टी हे सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. गोपाल शेट्टी यांचा त्यांच्या मतदारसंघात लोकसंपर्क खूप चांगला आहे. म्हणून हा मतदार संघ भाजपासाठी अतिशय सुरक्षित मतदार संघ मानला जातो. आताच झालेल्या ५ राज्याच्या निवडणुकीनंतर तीन राज्याच्या मुख्यमंत्रिपदी भाजपाच्या हायकमांडने विराजमान केलेले चेहरे पाहता भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचं 'धक्कातंत्र' सर्वांच्या लक्षात आलं आहेच. अशामध्ये आता कोणाचीही उमेदवारी निश्चित मानली जाऊ शकत नाही. याच कारणामुळे उत्तर मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबईतसुद्धा भाजपा धक्कातंत्राचा अवलंब करणार का? असा प्रश्न अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या बॅनरबाजीमुळे उपस्थित होत आहे.


निर्णय अद्याप गुलदस्त्यात?अभिनेत्री माधुरी दीक्षित या भाजपाकडून मुंबईत लोकसभा निवडणूक लढवणार या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत. मात्र, भाजपाकडून याला अजून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. याबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव किंवा चर्चा अजून झालेली नसून हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असणार आहे. साईबाबा उत्सवानिमित्त त्या मतदारसंघात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यातर्फे स्वागताचे बॅनर झळकले असले तरीसुद्धा भाजपाशी किंवा निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाही. समाजातील प्रमुख चेहरे, नामांकित व्यक्ती, उद्योजक, फिल्म क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या सर्वांकडे मोदी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा पोहचवण्याचं काम मध्यंतरी करण्यात आलं होतं. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या घरी भेट दिली होती. पण माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार की नाही? याबाबत अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नसल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. माधुरी दीक्षितला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार की नाही, हे जाहीर करण्यात भाजपा जास्त वेळ लावणार नाही. कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात करणं गरजेचं आहे. भाजपाकडून याबाबत घोषणा होईपर्यंत एरवी चित्रपटरसिकांच्या ह्रदयाची 'धकधक' वाढवणारी माधुरी विरोधी पक्षातल्या उमेदवारांबरोबरच भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या ह्रदयाची 'धकधक' सुद्धा वाढवणार आहे.

हेही वाचा:

  1. मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगेंची आज शेवटची इशारा सभा, काय घेणार निर्णय, याकडं नागरिकांचं लक्ष
  2. तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना संस्कृतमधून पत्र
  3. जिल्हा बँक घोटाळा प्रकरण: माजी मंत्री सुनील केदारांची तब्येत बिघडली; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details