मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झाले आहे. अशातच मुंबई महापालिकेने कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असेल तर दफन न करता दहन करावे, असे परिपत्रक काढले होते. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला धार्मिक वादाचे वळण मिळाले. त्यानंतर लगोलग हे परिपत्रक मागे घेण्यात आले आणि एक सुधारित परिपत्रक काढण्यात आले.
त्यामुळे मृतदेहाला दफन केल्यामुळे हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे का? किंवा दहन केल्यामुळेच हा व्हायरस पुर्णपणे नष्ट होतो का? असे सवाल उपस्थित झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तयार केलेल्या नियमावलीमध्ये कोरोनाग्रस्त मृतदेहांना दहन करावं किंवा दफन करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाग्रस्त मृतांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना लोकांनी गर्दी करू नये, शक्य तितक्या लवकर अंत्यसंस्कार करावेत, अंत्यसंस्कार करताना रुग्णालयातील स्वयंसेवकांची मदत घ्यावी, दहन करताना प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. इलेक्ट्रिक दहन करणं सोईचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
तर राज्यात या नियमांचे पालन करुन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारावेळी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांना पापीई किट देण्यात येत आहेत.
- जळगावात शासकीय नियमानुसार वृद्धावर अंत्यसंस्कार -
जळगाव शहरात 3 एप्रिलला एका 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्या वृद्धावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्धावर 4 नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पीपीई किट असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह स्मशानभूमीत नेला. त्यानंतर त्या ठिकणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिका निर्जंतुक करण्यात आली.
- औरंगाबादेत सोशल डिस्टंन्सचे पालन करत अंत्यसंस्कार -
औरंगाबादेत कोरोनाची लागण झाल्याने बँक अधिकार्याचा मृत्यू झाला. यावेळी अंत्यविधीसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. घाटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेत मृतदेह त्यांच्या घरी नेला. त्यानंतर त्याच कर्मचाऱ्यांनी जवळ असलेल्या स्मशानभूमीत सोशल डिस्टंन्सचे पालन करत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
- कराडमध्ये कृष्णा नदीकाठी अंत्यसंस्कार -
कराड येथील कृष्णा रुग्णालयातील एका 54 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावर कराड येथील कृष्णा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी विशेष पोषाख घातला होता.
नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वीच कृष्णा नदीकाठी दहनविधीच्या चौथऱ्याची बांधणी केली होती. शनिवारी सकाळी नगरपालिकेच्या 5 कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार केले. एका नातेवाईकाने मृताच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे स्वत: उपस्थित होते.