मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. त्याचा कालावधी संपत आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आणखी 15 दिवसांसाठी निर्बंध कायम करण्यात आले असल्याची माहिती दिली. दरम्यान, भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी बंधने पाळल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
'वादळाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज'
निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा तौक्ते चक्रीवादळ असेल ही वादळे नेहमीची झाल्याने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच नुकसान भरपाईचे निकष बदलवण्याची गरज असून त्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.
कोरोनाकाळातील उपाययोजनेची दिली माहिती -
दरम्यान, कोरोना काळात 54 लाख शिवथाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा खात्यात 154 कोटी 95 लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर फेरीवाल्यांसाठी 52 कोटींची निधी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
'रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक' -
राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषता ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे. कारण दुसऱ्या लाटेत कोरोना झपाट्याने परसतो आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्याला दरदिवशी 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून राज्याची क्षमता 1200 मेट्रिक टन आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता ऑक्सिजन निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.