मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आले आहे. अनलॉक-१ प्रमाणेच अनलॉक-२ मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेले लॉकडाऊन ३० जूननंतर उठणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असंही सांगितले होते. त्यानुसार आज मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या सहीने अधिसूचना जारी करण्यात आली असून लॉकडाऊन आणि निर्बंध कायम ठेवत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ५ हजार ४९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 7 हजार 429 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण 70 हजार 622 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 86 हजार 575 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
कोणत्या गोष्टींना परवानगी? -
- सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खासगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे. केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
- सामूहिक (ग्रुप) अॅक्टिव्हिटीजला परवानगी नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.
- सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन. यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करून काम करावे. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
- सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
नव्या अधिसूचनेनुसार ‘या’ गोष्टी बंधनकारक असणार -
- मास्क घालून चेहरा झाकणे अनिवार्य
- सोशल डिस्टन्सिंग, सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
- दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी.
- लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नाही, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी नाही.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध.