मुंबई- राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होत असल्याने काही शहरांमध्ये संचारबंदी किंवा अंशत टाळेबंदी लागू केली जात आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती, यावेळीही उन्हाळ्याला सुरुवात होत असताना कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. वर्षभरानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईत आता अंशत: टाळेबंदी लागण्याचे संकेत पालिका प्रशासन आणि मुंबईच्या महापौरांनी दिले आहेत. यामुळे मुंबईत येत्या काही दिवसात अंशतः टाळेबंदी लावताना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्याची तयारी पालिकेने केली आहे. मुंबईत विशेष करून दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात ९० टक्क्याहून अधिक रुग्ण इमारतींमधील आहेत. यामुळे मुंबईमधील इमारती पालिका प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.
नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे नियोजन
उद्यापासून म्हणजे शनिवार आणि रविवारी उपराजधानी नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारपासून म्हणजेच 15 मार्च ते 31 मार्च दरम्यान शहरात कडक संचारबंदी लागू केली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. संचारबंदी संदर्भात नागपुरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना काय वाटते? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी परत टाळेबंदी नको, अशीच प्रतिक्रिया दिली आहे. टाळेबंदीऐवजी नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट-तिप्पट दंड वसूल करावा, अशी सूचना केली.
नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर