मुंबई - लॉकडाऊनमुळे आंबेडकरी चळवळीतील सत्तर वर्षीय वयोवृद्ध गायकावर उपासमारीची वेळ आली. तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मदत करावं, असे आवाहन करण्यात आले होते. याची तात्काळ दखल घेत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी एक महिन्याचे रेशन गायकांच्या राहत्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे.
लालडोंगर परिसरात आंबेडकरी चळवळीतले गायक अनंत वाळके हे त्यांच्या पत्नीसह राहतात. किडनीचा विकार आणि काही वर्षांपूर्वी हृदय रोगाची शस्त्रक्रियेमध्ये त्यांची जमाकुंजी खर्च झाली. यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली. त्यांच्या पत्नी दुसऱ्यांच्या घरात घराकाम करतात. पण लॉकडाऊनमुळे त्यांचे हे काम बंद आहे. यामुळे वाळवे दाम्पत्यावर उपासमारीची वेळ आली.
वाळवे दाम्पत्याला मदत करा, असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. तेव्हा बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी याची दखल घेतली आणि लालडोंगर परिसरापासून काही अंतरावर असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते मनजीत जेठ यांच्याशी संपर्क साधला. पाटणकर यांनी मनजीत यांच्या हस्ते वाळके यांना एक महिन्याचे रेशन पाठवण्याची व्यवस्था केली.