मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, गेल्या 2 दिवसांपासून नऊ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात शनिवारी 49 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर या संदर्भात प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊनचे निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईसह राज्यामध्ये कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लादले जातील, असा इशारा दिलेला आहे. यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाला तर मुंबईत असलेल्या रेस्टॉरंट व बार चालकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, असे आहार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा -राज्यातील १७ हजार बालकांना मिळणार १ हजार रुपयांचे अनुदान
मुंबईत 80 हजार हॉटेल, लाखो अकुशल कामगारांसाठी मोठा रोजगार
मुंबई शहरामध्ये 80 हजारांहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियर बार व इतर आस्थपणांची नोंद आहे. या मधील सर्वाधिक मोठी संघटना असलेल्या आहारचे प्रमुख शिवानंद शेट्टी यांनी म्हटले की, राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात असताना याला आमचा कडाडून विरोध असणार आहे. याचे कारण देताना शिवानंद शेट्टी म्हणतात की, मुंबई शहरात असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियर बारसारख्या माध्यमातून अकुशल कामगारांना एक मोठा रोजगार सध्याच्या घडीला मिळतो. याबरोबरच राज्य शासनाला 500 कोटी रुपयांचा महसूलसुद्धा मिळत असल्यामुळे लॉकडाऊन हा कुठल्याही परिस्थितीत राज्याला, हॉटेल क्षेत्राला परवडणारा नसल्याचे त्यांनी म्हटले.