मुंबई- विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. नुकतेच पणन आणि वस्त्रोउद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर शासनामार्फत संबंधित सावकारास ती रक्कम अदा करण्यात येणार आहे.
अगोदर सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे. त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्या शेतकऱ्यांचं पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं आहे, त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. महात्मा फुले कर्जमाफी योजना असे या कर्जमाफी योजनेचे नाव आहे.
आतापर्यंत या कर्जमाफी योजनेच्या 2 याद्या जाहीर झाल्या आहेत. यातील पहिल्या यादीत 68 गावांतील 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ