महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना हमीभावासह संपूर्ण कर्जमाफी मिळावी; माकपच्या आमदाराची अपेक्षा - CPIM

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्रातील जागा वर्षानुवर्षे आक्रसत गेली. सध्या माकपचा एकमेव आमदार विधानसभेत निवडून गेला आहे. डहाणू मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार विनोद निकोले यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संवाद साधला.

mumbai
विनोद निकोले

By

Published : Nov 27, 2019, 7:12 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांसाठी, मजुरासाठी कायदे बनवावेत. हमीभाव जाहीर करावा. तसेच, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी अपेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणुचे आमदार विनोद निकोले यांनी व्यक्त केली. त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने विनोद निकोलेंशी संवाद साधला

विनोद निकोले म्हणाले, की परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळायला हवी. निकषांच्या कचाट्यात शेतकऱ्यांना अडकवू नये. निकष काहीही असले तरी ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्याची भरपाई द्यावी. सातबारा कोरा करण्यात यावा. शेतमालाला हमीभाव मिळावा ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची नव्या सरकारकडून अपेक्षा आहे.

माकपचा एकमेव आमदार
विनोद निकोले हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. ते डहाणू मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सर्वात गरीब आमदार म्हणून ते राज्यात चर्चेत आले होते. महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद दिवसेंदिवस आक्रसत जात आहे. निकोले माकपचा झेंडा विधानसभेत एकहाती धरुन ठेवत आहेत.


डहाणू मतदारसंघातील प्रश्न सोडवणार
डहाणू मतदारसंघ हा दुर्गम भाग आहे. शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न ज्वलंत आहेत. मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याची हेळसांड होते. त्यामुळे मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न विधानसभेत उठवणार असल्याचे निकोले यांनी सांगितले. तसेच, मतदारसंघात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात धरणांची संख्या जास्त आहे. या धरणांचे पाणी शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करू, असे निकोले म्हणाले. आमदार म्हणून मी शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details