मुंबई -राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले होते. नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनची शक्यता त्यांनी वर्तवली होती. मास्क न वापरणारे तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हाही दाखल केला जात आहे. आज दिवसभरातील राज्यातील विविध ठिकाणचे अपडेट्स..
८ हजारांच्या टप्प्यासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ
19:58 February 25
18:00 February 25
रुग्ण बरे होण्यामध्ये गोंदिया पहिल्या क्रमांकावर तर मुंबई 25व्या स्थानावर, अनुक्रमे 98.35 आणि 94.25 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
मुंबई - कोरोनाचा कहर राज्यात वाढतच चालला आहे.आता दिवसाला 8000 हुन रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे राज्याच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचवेळी एक दिलासादायक बाब एक आहे की रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 95.96 टक्के (आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 23 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारी प्रमाणे) असून जिल्हानिहाय विचार करता गोंदिया जिल्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक 98.35 टक्के असा आहे.
17:27 February 25
पोहरादेवी येथील संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम - पूजा चव्हाण आत्महत्या नंतर नॉटरीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड हे 23 तारखेला शक्ती प्रदर्शन करीत पोहरादेवी दाखल झाले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. दरम्यान, 2 तारखेला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महंत कबीरदास महाराज यांच्या कुटुंबातील 4 जणांसह आज 8 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
17:19 February 25
राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने कोरोना वाढण्याची भीती
मुंबई - कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत असताना राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. 0राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यातील कारागृहांबद्दल बोलायचे झाले तर राज्यातील कारागृहांमध्ये सध्याच्या घडीला प्रमाणापेक्षा अधिक कैदी ठेवण्यात आलेले असल्याचे समोर आले आहे.
16:44 February 25
मतिमंद वसतिगृहात 46 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील जिव्हाळा दीपक ताम्हणकर वसतिगृहातील तब्बल 46 मूकबधीर व मतिमंद विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्टाफसह अंत्रोळी गेले, त्याठिकाणी त्यांनी पाहणी केली.
16:38 February 25
राज्यात १७ जणांच्या आत्महत्या, तर जिल्ह्यात ५० हजारपेक्षा जास्त बेरोजगार, मंडप डेकोरेशन कर्मचाऱ्यांची स्थिती
कोल्हापूर -कोरोनाकाळात लग्नसराईला बंदी आल्यानंतर राज्यात १७ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती ऑल महाराष्ट्र टेंट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी दिली.
15:28 February 25
अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात ऑफलाइन दर्शनसुविधा बंद
मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सिद्धीविनायक मंदिराने भाविकांसाठी दर्शन घेण्याची वेगळी व्यवस्था उभी केली आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
15:27 February 25
मुंबईत नायर, केईएम, बिकेसी जम्बो सेंटर, राजावाडीत सर्वाधिक लसीकरण
मुंबई -मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. 23 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 86 हजार 158 आरोग्य कर्मचारी तर 13 हजार 754 फ्रंटलाइन वर्करचा समावेश आहे.
15:25 February 25
हिंगोली शहरात 12 तर ग्रामीण भागात 5 गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे. हिंगोली शहरातील बारा प्रभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे प्रभाग तर ग्रामीण भागातील पाच गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत.
15:21 February 25
'नियम आणखी कडक करा, पण रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होऊ देऊ नका'
शिर्डी - शिर्डीत लॉकडाऊन नको, अशी भूमिका येथील व्यवसायिकांची आहे. कोरोनाचे नियम आम्ही पाळतोय. वाटले तर आणखी कडक नियम करा,पण रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होऊ देऊ नका, अशी मागणी शिर्डीकर करत आहेत.
12:50 February 25
वाशिम : पोहरादेवी मंदिराच्या महंतांसह 7 जणांना कोरोनाची लागण
वाशिम -पोहरादेवी मंदिराच्या महंतांसह कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गावातील इतर 3 जणांचा अहवालदेखील पॉझिटीव्ह आला असून एकूण 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
12:21 February 25
अमरावतीत लॉकडाऊन वाढण्याची मजुरांना भिती
अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अमरावती शहर, अचलपूर शहर आणि अन्य नऊ गावात सात दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. 1 मार्च सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली नाही तर प्रशासन आणखी लॉकडाऊन वाढवू शकते, अशी भीती मजुरांना आहे. त्यामुळे अमरावतीतील अनेक मजूर पुन्हा एकदा आपल्या गावाकडे निघाले आहेत.
11:37 February 25
कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही डीजे लावून पालखी उत्सव साजरा; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोल्हापूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, नागरिक कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे गावामध्ये हजारो गावकऱ्यांनी एकत्र पालखी उत्सव साजरा केला. जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही डीजे लावून पालखी उत्सव साजरा झाला. याचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा कशा पद्धतीने फज्जा उडाला आहे. तसेच कोल्हापुरात मागील दोन दिवसांत 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
10:20 February 25
महाराष्ट्रात 126 दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारपार
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण विक्रमी संख्येने वाढत आहेत. बुधवारी एका दिवसात आठ हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला गेला आहे. १२६ दिवसांनंतर राज्यात आठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी ८८०७ संक्रमित रुग्ण सापडले. याआधी २१ ऑक्टोबर रोजी ८१४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
08:02 February 25
नागपूरमध्ये बुधवारी तब्बल 1181 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर
नागपूर- उपराजधानी नागपूरमध्ये बुधवारी तब्बल 1181 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नागपूरमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 15 दिवसांपूर्वी 250 ते 300 असणारी संख्या आज हजाराचा आकडा पार करत 1181 वर येऊन पोहचली आहे. यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाचा चांगला कस लागत आहे.
07:50 February 25
कोरोना रुग्णांची विभागवार आकडेवारी
- मुंबई पालिका - 1167
- ठाणे - 117
- ठाणे पालिका - 174
- नवी मुंबई पालिका - 149
- कल्याण डोंबिवली पालिका - 163
- नाशिक पालिका - 280
- अहमदनगर - 189
- अहमदनगर पालिका - 126
- जळगाव - 153
- जळगाव पालिका - 268
- पुणे - 310
- पुणे पालिका - 755
- पिंपरी चिंचवड पालिका - 408
- सातारा - 200
- औरंगाबाद पालिका - 203
- अकोला पालिका -150
- अमरावती - 194
- अमरावती पालिका - 627
- यवतमाळ - 179
- बुलढाणा - 168
- वाशिम - 315
- नागपूर - 818
- नागपूर पालिका - 230
- वर्धा - 188