नाशिक - प्रसिद्ध प्राचीन श्री काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाविकांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. आठ महिन्यानंतर मंदिर खुले झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पाडाव्यानिमित्त मंदिरात आरती, अभिषेक, महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
LIVE: आजपासून भाविकांसाठी राज्यातील मंदिरे खुली! - Shri Vitthal-Rukmini Temple Committee
12:16 November 16
प्रसिद्ध प्राचीन श्री काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी
11:49 November 16
तुळजापुरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण
कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदीर आज पाडव्याच्या मुहूर्तावर खुले करण्यात आले. त्यामुळेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काटेकोर नियम करण्यात आले आहेत. अगदी पहाटे 5 वाजल्यापासून या मंदिर परीसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असुन महाराष्ट्रासह, परराज्यातील भाविक देखील दर्शनासाठी तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत.
10:21 November 16
सप्तश्रृंगी मातेच्या काकड आरतीचा मान देवरे कुटुंबीयांना
महाराष्ट्रातील दैवत साडेतीन पिठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या काकड आरतीचा मान वैभव देवरे, सौ सोनल देवरे , चैतन्य देवरे, तेजस्वी देवरे यांना मिळाला. सप्तश्रृंगी देवी ट्रस्टच्या वतीने श्री वैभव देवरे यांना शाल श्रीफळ देण्यात आले.
10:06 November 16
गणपतीपुळे मंदिर देखील आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिर देखील आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. शासनाच्या अटी व शर्थीप्रमाणे भाविकांना श्रींचे दर्शन सुरु करण्यात आले. पहाटे 5 पासून याठिकाणी भाविकांना दर्शन सुरू झाले आहे. भाविकांची प्राथमिक तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जात आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून दर्शनच्या रांगेत 5 फुटांचं अंतर देखील ठेवण्यात आलं आहे.
10:00 November 16
नांदेडचा सचखंड गुरुद्वारा भाविकांसाठी खुला...
नांदेड - कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार) उघडण्यास सरकारने मंजुरी दिली. सरकारच्या या निर्णयाचे नांदेडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. नांदेडमध्ये जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आज गुरुद्वारा परिसर गर्दीने फुलून गेला असून भाविक व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
08:16 November 16
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात गणेशभक्तांच्या रांगा
पुणे - गेल्या आठ महिन्यांपासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.
08:06 November 16
शिर्डीच साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले
शिर्डी - आज दिवाळी पाडव्याला शिर्डीचे साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. पहाटे साडेचारच्या काकड आरतीसाठी सुमारे 60 भाविकांना सोडण्यात आल होते. आज मंदिर उघडणार असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले साई मंदिर आज भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. ठिकठिकाणी रांगोळी काढत आणि कमानी टाकत साईबाबा संस्थानने भक्तांच्या स्वागताची तयारी केली. तसेच साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. साई मंदिर परिसरही फुलांनी सजविण्यात आला आहे.
07:22 November 16
दररोज एक हजार भाविकांना लाभ
पंढरपूर- कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिवाळी आज सुरू होणार आहेत. मात्र विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी भाविक वारकऱ्यांना केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. तसेच दररोज केवळ एक हजार भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेता यणार आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग महत्त्वाचे असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करून हे दर्शन होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
06:18 November 16
LIVE: आजपासून भाविकांसाठी राज्यातील मंदिरे खुली!
मुंबई -आजपासून भाविकांसाठी राज्यातील मंदिरे खुली होणार आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने (पंढरपूर) दीपावली पाडवानिमित्त संपूर्ण मंदिर सुंदर व मनमोहक रंगबेरगी फुलांनी सजवण्यात आले आहे. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौखांबी मंडप लाल व पिवळ्या जलबिरा फुलांनी सजवल्यामुळे सुंदर व मनमोहक दिसत होता.