मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील 'मन की बात' या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामूहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा या दृष्टीने पंतप्रधानांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील आणि अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 'मन की बात' चे ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा रेडिओवरून प्रसारण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. देशाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून लाभले हे देशाचे सौभाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
लोकांची विकासाची चळवळ:स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यांसह अनेक विषयांवर मोदी यांनी 'मन की बात' मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे पंतप्रधान मोदी 'परीक्षेवर चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले, असे राज्यपालांनी सांगितले. तसेच 'मन की बात' ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे, असे सांगून कार्यक्रमाचा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.