मुंबई -आसामसह मेघालयात हवामान खात्याने रेड अलर्ट ( IMD red alert ) जारी केला आहे. या दोन्ही राज्यात आज आणि उद्या अतिवृष्टी होण्याचा हवामान ( Thunderstorm Alert weather ) खात्याने इशारा दिला आहे.
पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे. येत्या 5 दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्याचा आणखी काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडू, काही भाग विदर्भ आणि तेलंगणामध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती ( Better condition for Monsoon in Maharashtra ) अनुकूल आहे.
'या' भागात आगामी पाच दिवस पावसाची शक्यता :आगामी पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल झाला ( Maharashtra Monsoon Updates ) आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्याने राज्यात येत्या 5 दिवसांसाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज :भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
असा आहे हवामानाचा अंदाज-भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या नव्या अंदाजानुसार यंदा पश्चिम भारतात 92 ते 108 टक्के पाऊस होण्याती शक्यता आहे. दुसरीकडे दख्खनच्या पठारावर 93 ते 107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जून महिन्यात सरासरी पाऊस होण्याचा अंदाज-भारतीय हवामान विभागाकडून जून महिन्यात होणाऱ्या पावसाची सरासरीचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता.