मुंबई - पावसाळ्यात मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळावर पाणी साचण्याचे रडगाणे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सुरूच आहे. मात्र, यातून पावसाळ्यात लोकल वाहतूक सुरळीत चालावी याकरिता उपाययोजनासाठी फक्त आयआयटीचे नाव रेल्वेकडून पुढे केले जाते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीसुद्धा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयआयटीची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहे. मात्र, प्रत्यक्षात काहीच होताना दिसून येत नाही. त्यामुळे मुंबईकरांची उपनगरीय लोकल सेवा चालविण्यासाठी मुंबई आयआयटीला द्या, अशी अजब मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.
रेल्वे अधिकारी काय करत आहेत?
दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा मध्य रेल्वेची रोज ‘मरे’ त्याला कोण रडे? अशी अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे व हार्बर लाईन वरील कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांदारम्यान लोकल रेल्वे सेवा तब्बल साडे नऊ तास बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मुंबईकरांचे दरवर्षीप्रमाणे यंदाही अतोनात हाल झाले आहेत. यांची दखलसुद्धा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतली आहे. मान्सूनचा पाऊस हाताळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांची मदत घेण्याचा सल्ला पीयूष गोयल यांनी रेल्वेला दिला आहे. मात्र, मग रेल्वेचे अधिकारी काय करत आहेत, असा प्रश्न उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे.
लोकल आयआयटी मुंबईला चालवायला द्या?
रेल्वे आपल्या अभियांत्रिकी अधिकाऱ्यांना विदेशात ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवतात. त्यांचे बहुतांश अधिकाऱ्यांची शिक्षण सुद्धा आयआयटीमधून झाले आहे. मात्र, त्यांच्या आज फायदा होताना दिसून येत नाही. दरवर्षी लोकल प्रवासांचे हाल होत आहे. आयआयटीचे नाव पुढे करून वेळ काढुपणा रेल्वेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेने मुंबई उपनगरीय लोकल आयआयटीला चालवायला द्यावीत, असा प्रश्नसुद्धा नंदनकुमार देशमुख यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच दरवर्षी रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. हा निधी मोठ्या नाल्यांच्या कल्व्हर्टची सफाई करण्यास दिला जात असला, तरी त्याची सफाई होत नाही. नेहमीच रेल्वे आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवितात. त्यामुळे आता एकमेकांना दोष देणे बंद करून, काही तरी ठोस उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले.