मुंबई :राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 17 जुलैपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सक्षम आणि आक्रमक प्रश्न विरोधी पक्षामार्फत मांडले जाणार आहेत. मात्र, या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता अन्य दोन्ही पक्ष निष्प्रभ झाले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचाच वर्चस्व राहणार अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांना विचारले असता त्यांनी मात्र आपण आक्रमक भूमिका घेणार असल्याचे म्हटले.
शेतकरी जनतेच्या प्रश्नावर सरकारला घेरणार :राज्यातील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. विदर्भातील शेतकरी पावसाअभावी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकास कामांना निधी दिला जात नाही. या सर्व बाबींवर येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला विधिमंडळात घेण्याची तयारी आम्ही केली आहे. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.