मुंबई - मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा करदात्यांना दिलासा देणारा, शेतकऱ्यांचा विकास साधणारा, रोजगाराच्या नवीन संधी देणारा व देशाच्या सुरक्षिततेसाठी अधिक आर्थिक तरतूद करणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात स्वास्थ, संपन्नता व सुरक्षा या प्रमुख गोष्टींवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
हेही वाचा -संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, नवीन शस्त्रास्त्रांसाठी १ लाख १० हजार ७३४ कोटी
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. कररचनेतील नवीन बदलाचा लाभ कोट्यवधी करदात्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी विकासाच्या नवीन सुविधा व योजना सुरू करण्यात येणार असल्यामुळे त्याचा खरा फायदा बळीराजाला मिळणार आहे. अर्थसंकल्पात कृषी, सिंचन व ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी १६ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा -देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री
या १६ कलमी कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक, एक वस्तू-एक जिल्हा, जैविक शेती, झीरो बजेट शेती या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महिला विकासावर भर देण्यात आला आहे, तसेच ओबीसी-एससी वर्गाचा विकास याचा सकारात्मक विचार करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या योजनांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्यावर भरीव आर्थिक तरतूद ही या क्षेत्राच्या विकासाला चालना देणारी आहे, असे ते म्हणाले.