मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना जो किमान समान कार्यक्रम ठरला होता, त्यामध्ये मुस्लीम आरक्षणाच्या बाबतीतील भूमिका अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उत्तरातून अखेर समोर आली आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील मुस्लीम आरक्षणाला शिवसनेने मान्यता दिली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेसमोर शिवेसनेची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरामध्ये अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या उत्तरातून मुस्लीम आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका समोर आली आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेने मान्यता दिली असावी, असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला. नवाब मलिक यांनी सरकारची बाजू मांडली. त्यावेळी मंत्री मलिक यांनी या मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचाही पाठिंबा आहे, तसेच शिवसेनेच्या आमदारांचाही मुस्लीम आरक्षणाला विरोध नसून पाठिंबा आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना व शिवसेनेचे आमदार मुस्लीम आरक्षणाच्या बाजूला असल्याचे स्पष्ट चित्र सभागृहात दिसून आले असल्याचेही दरेकर म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारची भूमिका हीच असल्याबाबत मलिक यांना विचारले असता, त्यांनी ते मान्य कले. तसेच सभागृहात उपस्थित आदित्य ठाकरे यांनीही होकारार्थी मान डोलावून मलिक यांच्या भूमिकेला दुजोराच दिला आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील मुस्लीम आरक्षणाच्या बाजुची शिवसेनेची भूमिका आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेसमोर आल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.