मुंबई:विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर केले जाणार आहे. अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक:कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत पाचही जिल्ह्यात ९१ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात साधारणपणे ८८. ८६ टक्के मतदान झाले होते. ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदार होते. यामध्ये ६०२९ पुरुष तर ९२७१ स्त्री मतदारांचा समावेश होते. 30 जानेवारीला झालेल्या मतदानात एकूण १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक:नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान 30 जानेवारीला पार पडले. प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली होती. पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. मतदारांसाठी एका दिवसाची रजा मंजूर करण्यात आली होती. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली होती. या निवडणुकीत 2 लाख 62 हजार 721 मतदार होते. 16 उमेदवार आपले नशीब आजमावत होते.