मुंबई -राज्यात 21 मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार असून संख्याबळानुसार काँग्रेस केवळ एका जागेवर विजय मिळवू शकतो. मात्र, या एका जागेसाठी पक्षातले 123 जण इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. परिषदेची निवडणूक एप्रिलच्या महिना अखेरीला गृहीत धरून पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 123 कार्यकर्त्यांनी पक्षाकडे परिषदेवर संधी मिळावी, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात जेष्ठ काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला असता, ही पक्षाची अंतर्गत बाब आहे, याबाबत जाहीर बोलणे पक्ष शिस्तीचा भंग होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी रांग - maharashtra election news
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार असून संख्याबळानुसार काँग्रेस केवळ एका जागेवर विजय मिळवू शकतो. मात्र, या एका जागेसाठी पक्षातले 123 जण इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसमध्ये काही दिगग्ज नेते ही विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे चर्चिले जात आहे. यात माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही पक्ष श्रेष्ठीकडे परिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर भटक्या विमुक्त समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे हरिभाऊ राठोड यांना पक्षाने पुन्हा संधी द्यावी, अशीं इच्छा आधीच व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांनीही परिषदेवर जाण्यासाठी दिल्लीतही फिल्डिंग लावली असून त्यांचे पारडे जड असल्याचे पक्षात बोलले जात आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात 123 कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही अचंबित झाले असून आता कुणाच्या नावाची शिफारस करायची, असा प्रश्न त्यांनाही पडला असून आता सारी भिस्त दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींवर असणार आहे.
दरम्यान, महाघाडीतील शिवसेना आणी राष्ट्रवादी प्रत्येकी दोन तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. मात्र, असे असतानाही काँग्रेस अन्य एका जागेसाठी इच्छुक आहे. आघाडीतल्या घटक पक्षांसह अपक्षांना सोबत घेऊन अतिरिक्त एक जागा लढवावी, असा राज्यातली काँग्रेस नेत्यांचा विचार आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असून याचा लाभ विरोधी पक्षालाही होण्याची चिन्ह असल्याने निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.