मुंबई: विधान परिषदेची निवडणूक सोमवार 20 जुलैला होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस आमदारांची महत्त्वाची बैठक सायंकाळी पाच वाजता बोलवली आहे. विधान भवनात असलेल्या काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच महत्त्वाचे मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसच्या दोन उमेदवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी काँग्रेसने सर्व ताकद पणाला लावली आहे. महा विकास आघाडीचे सर्व उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून यावे यासाठी अजित पवार यांच्यासोबत देखील काँग्रेस नेत्यांनी बैठक घेतली. आज सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक झाल्यानंतर त्यांनादेखील विधान परिषदेची निवडणूक होईपर्यंत पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.