मुंबई : वैध मापन शास्त्र विभागाकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकणाऱ्या दुकानांवर अथवा असता पानांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. वैध मापन शास्त्र विभागाकडून पथक ग्राहकाच्या वेशात दुकानात जाऊन पाहणी करून कारवाई करतात. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात 491 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या दुकानात येणारी व्यक्ती तपास अधिकारी पथकातील निघाल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते.
आस्थापनांवर करडी नजर : राज्याचे वैध मापन शास्त्र विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, अवघ्या पाण्याच्या बाटलीपासून ते इतर वस्तूंवरील छापील किंमत पाहून ग्राहकाने वस्तू खरेदी करणं महत्त्वाचं आहे. ग्राहकांनी जागरूक राहून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूचे प्रमाण किंमत पॅकेजिंग योग्य आहे की, अयोग्य आहे याची पडताळणी करणे हा ग्राहकांचा हक्क आणि अधिकार आहे. आमची सर्व दुकान आणि आस्थापनांवर करडी नजर असून ग्राहकांवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
कुठे जायचं तक्रार करायला? : मुंबईतील धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही घाईघाईत वस्तू खरेदी करत असाल, तर थोडं लक्ष देऊन एखाद्या वस्तूची खरेदी करा. पाण्याची बॉटल असो किंवा शीतपेय असो त्या बॉटलवरील छापील किमतीपेक्षा जास्त किंमत दुकानदाराने आकारली तर कुठे जायचं तक्रार करायला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. ग्राहकांना याबाबत तक्रार करायची असल्यास ते (022-22622022) या क्रमांकावर किंवा व्हाट्सअप क्रमांक (9869691666) त्या क्रमांकावर थेट तक्रार करण्याचे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाने केले आहे.