मुंबई :देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपासून ते दोन वेळेची जेवणाची भ्रांत असलेले अशा सर्व स्तरातील लोक राहतात. अशा या मुंबईत समस्यांची कमी नाही. यातील प्रमुख समस्या म्हणजे पाणी. अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुंबईकर नेहमीच सामना करत असतात. त्यामुळे काही वेळा खाजगी कूपनलिका देखील काही जण खोदून घेतात. मात्र, आता जर तुम्ही विनापरवाना खाजगी खूप नलिका खोदली असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका कठोर कारवाई करणार आहे.
कुपनलिकांमुळे दुर्घटना :या संदर्भातील माहिती देणारे एक प्रसिद्धीपत्रक बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आले आहे. यात पालिकेने म्हटले की, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील पाणीपुरवठ्यासाठी गुंदवलीपासून भांडुप संकुल जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत तलावातील पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जल बोगद्याची व्यवस्था केली आहे. तसेच, भांडुप संकुल येथून शहर व उपनगरातील विविध सेवा जलाशयापर्यंत व सेवाजलाशयापासून ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलबोगद्याचे जाळे उभारले आहे. मागील काही वर्षात विंधन विहिरी, कूपनलिका खोदताना भूमिगत जलबोगद्यास हानी पोहचून दुर्घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे पाणीपुरवठा बऱ्याच कालावधीकरीता विस्कळीत होतो व नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतो.