मुंबई- सायबर गुन्हेगारीच्या विरोधात काम करणाऱ्या महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून नेटिझन्ससाठी एक नवीन इशारा देण्यात आलेला आहे. सध्या सायबर गुन्हेगारांकडून इंस्टाग्राम वापरकर्त्यांना सुचित करण्यात आले आहे की, सायबर गुन्हेगारांकडून इंस्टाग्राम कॉपीराईट फिशिंग स्कॅमचा सायबर हल्ला सध्या केला जात आहे.
काय आहे इंस्टाग्राम कॉपीराईट फिशिंग..?
इंस्टाग्राम कॉपीराईट फिशिंग स्कॅम नावाचा एक नवीन सायबर गुन्हेगारीचा प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून इंस्टाग्राम वापरकर्त्याला एक विशिष्ट लिंक पाठवली जात असून याद्वारे संबंधित इन्स्टाग्राम वापरकर्त्याला इन्स्टाग्राम नियमांचे उल्लंघन केले म्हणून 24 तासांमध्ये संबंधित खाते बंद केले जाण्याचा इशारा देण्यात येत आहे. हे टाळण्यासाठी एका लिंकवर क्लिक करून त्यामध्ये एक फॉर्म भरण्यासही सांगितले जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक विशेष व्हायरस संबंधित इंस्टाग्राम वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये जाऊन त्याची सर्व गुप्त माहिती चोरत असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. या विशिष्ट व्हायरसमुळे इंस्टाग्राम वापरकर्त्याच्या बँकिंग व्यवहारातबाबत गोपनीय माहिती, क्रेडिट कार्डचे डिटेल्स, याबरोबरच इतर खासगी गोपनीय माहिती चोरली जात असून यामधून पीडित व्यक्तीची लूट केली जात असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.