मुंबई- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असताना भाजपच्या चित्रा वाघ दिवसेंदिवस पूजाच्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. सततच्या बदनामीला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तरीही भाजपच्या चित्रा वाघ प्रसारमाध्यमांसमोर दररोज नवीन स्टंटबाजी करत आहेत. या गंभीर प्रकरणी चित्रा वाघ यांच्यावर उच्च न्यायालयात पुराव्यासहीत मानहानीचा दावा ठोकणार आहे, अशी माहिती वकील नितीन माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड कारणीभूत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लावून धरली आहे. सोशल माध्यमातून व्हायरल झालेल्या संभाषण क्लिप आणि मंत्र्यांचे फोटो मोठा पुरावा आहे, असे वाघ यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजपकडून गलिच्छ राजकारणासाठी आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहेत. आमची बदनामी थांबवावी, अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल, असा निर्वाणीचा इशारा पुजाच्या आई-वडिलांनी दिला आहे.
आत्महत्या केल्यास जबाबदारी घेणार का?
सध्या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. तपासात संबंधित व्यक्तीचे नाव देखील पुढे आलेले नाही. तरीही भारतीय जनता पक्षाकडून पीडित कुटुंबाला गलिच्छ राजकारणाचे शिकार बनवले जात आहे, असा वकिल नितीन माने यांचा आरोप आहे. राजकारणामुळे पीडित कुटुंबातील व्यक्तीची यात नाहक बदनामी होत आहे. उद्या त्यांच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केल्यास ते जबाबदारी घेणार आहेत का? असा सवालही माने यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.