मुंबई ST Chakka Jam Andolan : ऐन सणासुदीच्या (Diwali 2023) काळामध्ये लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेचे सर्वेसर्वा गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून चक्का जामची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं सणाच्या कालावधीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच एसटी महामंडळाचे देखील आर्थिक नुकसान होणार असल्याचं बोललं जातंय.
कामगारांनी स्वतःहून सहभागी व्हावे : गणेशोत्सवाच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. राज्य सरकारच्या वतीनं एसटी कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्यानंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला होता. आता पुन्हा सोमवारपासून विविध मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कामगारांनी चक्का जाम आंदोलनात स्वतःहून सहभागी व्हावे, असं आवाहन सदावर्ते यांनी एसटी कामगारांना केलं आहे.
चक्का जाम आंदोलन : 'ई टीव्ही भारत'शी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा संप वगैरे काही नाही. माध्यमांमध्ये वेगळ्या प्रकारे बातम्या येत आहेत. चक्का जाम (Chakka Jam) असणार आहे. सध्याच्या काळात महामंडळाच्या बसेसची काय परिस्थिती आहे ही सर्वांना माहित आहे. अनेक बसेस रस्त्यावर धावण्यायोग्य नाही, अनेक बसेसचे इन्शुरन्स नाही, एसटी महामंडळातील 85 टक्के बस या नादुरुस्त आहेत. आरटीओच्या नियमाप्रमाणे अनेक बसेस रस्त्यावर चालवण्यास योग्य नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच बस गाड्यांमधील वायरिंग व्यवस्थित केली जावी. सातवा वेतन लागू करावा. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण तसेच राज्य सरकारच्या वतीनं कर्मचाऱ्यांना 48 टक्के महागाई भत्ता दिला आहे. त्यातील थकबाकी अद्याप मिळालेली नाही. थकबाकी लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून एसटी महामंडळाची एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही, त्या दिवसाचा पगार एसटी महामंडळाला द्यावाच लागेल.