मुंबई- लोकल रेल्वेच्या धर्तीवर एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ५० रुपये स्मार्ट कार्डची किंमत असून सुरुवातीला ३०० रुपये रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर १०० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती हे कार्ड वापरू शकते.
मुंबईत एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ - एसटी महामंडळ
मुंबई लोकल रेल्वेच्या धर्तीवर एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ५० रुपये स्मार्ट कार्डची किंमत असून सुरुवातीला ३०० रुपये रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर १०० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती हे कार्ड वापरू शकते.

येत्या काळात इंधनाच्या भरमसाठ खर्चामुळे सर्व गाड्या एलएनजीवर चालविण्यात येतील. यामुळे एसटीची ८०० कोटी रुपयांची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे रावते यांनी सांगितले. एसटीच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी अंतरिम वाढ दिल्याच्या दिनांकापासून सातव्या वेतन आयोगातील २.६७ च्या गुणकाप्रमाणे वेतनवाढ लागू होईल. तसेच अधिकाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करून ग्रॅच्यूटी मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा रावते यांनी केली.
महामंडळातील कर्मचाऱ्यांना विविध कारवाईंना सामोरे जावे लागते. त्यामुळे या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल करणारी सुधारित शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रावते यांनी जाहीर केली. यावेळी एसटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर ५ सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एसटीचे पहिले वाहक ९४ वर्षीय लक्ष्मण शंकर केवटे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.