मुंबई - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा तातडीने होणे आवश्यक होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना ऑक्सिजनच्या ड्युरा सिलेंडर्सचा पुरवठा रोमेल रिअल्टर्स पुरवठादाराने उशीरा केला. त्यामुळे मे. रोमेल रिअल्टर्स या पुरवठादाराला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना बरे करण्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग दिवस रात्र एक करून काम करत आहे. कोरोना रुग्णांना विशेष करून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासते. पालिकेच्या रुग्णालयांना आणि कोरोना केअर सेंटरना ऑक्सिजन प्लान्ट, ऑक्सिजन सिलेंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
त्यासाठी पालिकेने मे. सतरामदास गॅसेस प्रा. ली. यांच्याकडून ३० ड्युरा सिलेंडर तर मे. रोमेल रिअल्टर्स यांच्याकडून ७० ड्युरा सिलेंडर मागावण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे या पुरवठादारांकडून सिलेंडर मागवण्यात आले. गोरेगाव स्थित नेस्को कोरोना आरोग्य केंद्रासाठी ड्युरा सिलेंडर्स पुरवठा करण्याचा अनुभव मे. रोमेल रिअल्टर्स यांना असला तरी त्यांनी वेळेवर सिलेंडरचा पुरवठा केला नाही. तसेच पुरवठा केलेल्या ड्युरा सिलेंडरसोबत त्यांची जोडसाधने पुरविली नाहीत, या कारणांनी मे. रोमेल रिअल्टर्स या कंत्राटदाराला पालिकेने ९ लाख ९० हजार २४७ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पुरवठादाराने वेळेवर ऑक्सिजनची ड्युरा सिलेंडर पोहचवली नसल्याने पालिकेला इतर ठिकाणाहून युद्ध पातळीवर ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित करावी लागली. त्यामुळे रोमेल रिअल्टर्सला दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.