मुंबई :आपल्या आवाजाने अजरामर असणाऱ्या लता दिदींचा ६ फेब्रुवारी प्रथम स्मृती दिन आहे. याबाबत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मेराक इव्हेंट यांच्या सहयोगाने 'लतांजली' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.लता दिदींचा ६ फेब्रुवारी प्रथम स्मृती दिनानिमित्ताने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६:३० वाजता 'लतांजली' कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे,शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे आदी गायिका तर निवेदक म्हणून संदिप पंचवटकर, आर.जे.गौरव यांच्या सह नामवंत वादक असे एकुण ५० कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे लता दिदींनी ज्या अभिनेत्रींना आवाज दिला त्यातील तब्बल १२ सुपरस्टार अभिनेत्रींची उपस्थिती हे सुध्दा या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे.
राखी ते राणी मुखर्जी :यामध्ये सिने स्टार अभिनेत्री राखी, हेमा मालिनी, आशा पारेख, मौसमी चटर्जी, पद्ममीनी कोल्हापूरे, नितू सिंग, बिंदू, रिना राँय, पुनम ढिल्लो, रविना टंडन, राणी मुखर्जी आणि काजोल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. या कार्यक्रमाला संगीतकार आनंदजी, प्यारेलाल आदी ही उपस्थिती राहणार असून रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य असून जाहीर होताच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्याची माहिती संयोजक मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी दिली.
मुंबई पोलीस बँड तर्फे लतांजली :लतांजली कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात मुंबई पोलीस बँड तर्फे लता दिदींची काही निवडक गाणी वाजवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन : भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी निधन झाले होते. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या भारतीय संगीतातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने १९६९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2008 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त लाइफटाइम अचिव्हमेंटसाठी वन टाइम अवॉर्ड देखील मिळवला आहे.
फिल्मफेअर पुरस्कार : पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली. 1970 मध्ये, लतादीदींनी नवीन व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सोडण्याचा संकल्प केला. त्यानंतर 1993 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 1994 आणि 2004 मध्ये फिल्मफेअर विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.