मुंबई- कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. असे असतानाही मुंबई पोलिसांकडून वाढलेल्या गुन्ह्यांचा तपास तेवढ्याच मोठ्या पद्धतीने केला जात आहे. जून महिन्यात मुंबई शहरात तब्बल 5 हजार 797 गुन्हे घडले असून यात 4 हजार 797 प्रकरणाचा छडा मुंबई पोलिसांनी लावला आहे.
ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल...
मुंबई पोलीस खात्यात आतापर्यंत 3 हजार 200 पोलीस संक्रमित झाले असून यात 2 हजार 771 कर्मचारी व 429 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला कोरोना संक्रमित झाल्यानंतर पूर्णपणे बरे झालेले 1 हजार 873 पोलीस हे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले असून, 531 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
जानेवारी ते जून अशा सहा महिन्यांत मुंबईत एकूण 24 हजार 847 गुन्हे घडले आहेत ज्यात 18 हजार 981 गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांनी पूर्ण केला आहे. घडलेल्या एकूण गुन्ह्यांचा तपास करीत मुंबई पोलिसांनी तब्बल 76 टक्के प्रकरणांचा छडा लावीत आरोपींना अटक केली आहे.
जूनमध्ये मुंबई घडलेले मोठे गुन्हे व त्यांची उकल कंसात..
हत्या - 13 (12), हत्येचा प्रयत्न - 36 (29), रॉबरी - 33 (17), खंडणी -9 (6), जखमी करणे - 302 (189), बलात्कार - 46 (26), लॉकडाऊन व संचारबंदी कारवाई- 4777 (4385)
पोलीस मनुष्यबळ कमी जरी असले तरी तपासावर परिणाम नाही...
देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लोकसंख्या 2 कोटींच्या आसपास असताना यात सध्याच्या घडीला 40 हजार पोलीस मुंबईच्या रस्त्यावर 24 तास काम करीत आहेत. लॉकडाऊन काळात कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याने घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबई शहरात पसरलेले सीसीटीवीचे जाळे, पोलिसांची खबऱ्यांची गुप्त माहिती याबरोबरच योग्य तांत्रिक तपास यामुळे गुन्ह्यांची उकल होत असल्याचे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्र हॉटस्पॉट झाला आहे. अशा स्थितीत पोलीस कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत. राज्यात आतापर्यंत 1 हजार 583 पोलीस कोरोना संक्रमित असून यात 185 पोलीस अधिकारी व 1 हजार 398 पोलीस कर्मचारी आहेत. आतापर्यंत राज्यात 89 पोलिसांचा मृत्यू झाला असून यात सर्वाधिक 52 मृत्यू हे मुंबई पोलीस खात्यात झाले आहेत.
मुंबई पोलीस खात्यात आतापर्यंत 3 हजार 200 पोलीस संक्रमित झाले असून यात 2 हजार 771 पोलीस कर्मचारी व 429 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला कोरोना संक्रमित झाल्यानंतर पूर्णपणे बरे झालेले 1 हजार 873 पोलीस हे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले असून, 531 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनातून 2 हजार 622 पोलीस हे बरे झाले आहेत.