मुंबई-राज्यात एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना जमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून आता सूट मिळणार आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमात सुधारणा करण्यास आज विधानसभेत मान्यता मिळाली. परंतु, यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भावना आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार गोरे यांनी विधानसभेत घेतलेल्या आक्षेपांवर उत्तर देताना महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायद्यात नियम करून बिल्डरांवर नियंत्रण आणू, असे आश्वासन दिले.यापूर्वी उद्योगांना ५४ एकर जमीन खरेदीची मर्यादा होती.विधानसभेतील मंजूरीने आता खऱ्याखुऱ्या औद्योगिक किंवा अन्य बिगर कृषी वापरासाठी औद्योगिक उपक्रमाकडून धारण करण्यात आलेली किंवा धारण करावयाच्या जमिनीस सूटदेण्यात आली आहे.त्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम- १९६१ च्या कलम ४७ (२) (क) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.