मुंबईLalit Patil Case Exclusive:ललित पाटील विरोधात 2023 मध्ये पुण्यातील बंड गार्ड पोलीस ठाण्यात दोन 'एनडीपीएस'चे गुन्हे दाखल आहेत. त्याआधी चाकण पोलीस ठाण्यात 2020 मध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील विरोधात 'एनडीपीएस'चा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यापासूनच ललित पाटील नावाचा ड्रग्ज माफिया पुणे पोलिसांच्या रडारवर आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची पाळेमुळे शोधून काढण्यास सुरुवात केली. ललित पाटीलची दोन लग्न झाली असून त्याच्या पहिल्या बायकोचे निधन झाले आहे. तर दुसऱ्या बायकोला त्याने सोडचिट्टी दिली आहे. त्याचबरोबर तिसर्या एका वकील असलेल्या महिलेसोबत सध्या ललित पाटील राहत असल्याची माहिती मिळत आहे. ही कथित तिसरी पत्नी असलेली महिला वकील छोटा राजन गॅंगशी संबंधित असलेला ड्रग्ज माफिया आणि इतर ड्रग्जच्या केसेसमध्ये अडकलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करते.
म्हणून ड्रग्ज निर्मितीत गुंतविला पैसा:छोटा राजनचा साथीदार तुषार काळे हा बोरिवली परिसरात राहत होता. मात्र एका खुनाच्या प्रकरणात कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये अटकेत असलेल्या तुषार काळेची ओळख जेलमधील शेळके नावाच्या एका गुन्हेगाराशी झाली. तसेच कळंबा जेलमधील जुबी नावाच्या नायजेरियन नागरिकाची ओळख शेळके व तुषार काळे यांच्याशी झाली. जुबी हा नायजेरियन आरोपी ड्रग्जच्या केसमध्येच कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. जेलमधून सुटल्यानंतर तुषार काळेने त्याच्यामुळे पत्नीच्या सहाय्याने शूज विक्री तसेच कापड व्यवसाय थाटून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले. दरम्यान तुषार काळे यानी शेळके सोबत भेट घेतली आणि ते दोघेही जुबीला भेटले. त्यावेळी जुबीने कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी एमडी या ड्रग्सच्या निर्मितीपासून पैसे कमावण्याची युक्ती दिली. त्यासाठी त्याने एमडी हा ड्रग्स कसा बनवायचा यासाठी भानुदास मोरे या ठाण्यातील कळवा जेलमध्ये बंद असलेल्या आरोपीशी संपर्क करून दिला. त्यानंतर जेव्हा जेव्हा भानुदास मोरे रिमांड कामे कोर्टात येईल तेव्हा तुषार काळे भानुदास मोरेला नातेवाईक किंवा मित्र म्हणून भेटायला येत असे आणि एमडी ड्रग्स बनवण्याची माहिती घेत होता. जुबीने तुषार काळेला सांगितले होते की, जे एमडी तू बनवशील ते मी स्वतः विकत घेईन. भानुदास मोरे कडून घेतलेली माहिती काळेने राकेश खानवडेकर याच्या मदतीने कर्जत येथे एक फार्म हाऊस विकत घेऊन त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवण्याची प्रक्रिया केली. मात्र, कर्जत येथे फार्महाउसवर बनवलेले एमडी दर्जेदार नव्हते. म्हणून तुषार काळे आणि राकेश कानवडेकर यांनी परशुराम जोगल या ठाणे शहरात राहणाऱ्या अंमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीची ओळख काढून महाड येथे ट्रेनिंग घेतले.
इथूनच ललित पाटीलचा ड्रग्ज व्यवसायात प्रवेश:महाड येथे परशुराम जोगल, मंदार भोसले ठाण्यातील मुक्का मधील आरोपी मनोज पालांडे, अफजल संसारा, अरविंद कुमार लोहारे हे एमडी बनवून मुंबई ठाणे परिसरात विक्रीचे व्यवसाय करत होते. त्याआधी अरविंद लोहारे याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात एमडी ड्रग्स बनवण्या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्याला जामिनासाठी ललित पाटील व त्याची कथित पत्नी यांनी मदत केलेली होती. इथूनच ललित पाटील याचा ड्रग्जच्या काळा बाजारात प्रवेश झाला. ललित पाटीलची कथित पत्नी वकील म्हणून काम करते आणि आरोपींना जामीन होण्यासाठी शहरातील चांगले वकील मिळवून देते. ललित पाटील हा आरोपी आणि वकील यांच्यातील आर्थिक व्यवहार पाहत असे. त्या बदल्यात ललित पाटील आणि त्याच्या कथित पत्नीला आरोपींकडून मोठी रक्कम मिळत होती. त्याचप्रमाणे ललित पाटील याने यापूर्वी अरविंद लोहारे, मनोज पालांडे आणि अफजल यांच्याकडून एमडी ड्रग्स घेतलेले होते, असे आरोपींनी पुणे पोलिसांना सांगितलेले आहे.
35 लाखात एमडी बनविण्याचे ट्रेनिंग:महाड मधील अल्केमी केमिकल्स आणि निंबस फार्मा या दोन बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये एमडी बनवण्याचे ट्रेनिंग अरविंद लोहारे याने परशुराम जोगल आणि तुषार काळे, राकेश खानवडेकर यांना दिले. त्या मोबदल्यात अरविंद लोहारे आणि त्याच्या साथीदारांना ट्रेनिंगचे 35 लाख रुपये दिले. दरम्यान किरण राजगुरू नावाचा आरोपी महाड येथील फॅक्टरीमध्ये कच्चामाल पुरवत होता. त्याची देखील ओळख तुषार काळे आणि राकेश खानवडेकर यांच्याशी झाली. नंतर तुषार काळे त्याने मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स बनवण्याचे ठरवले आणि इतर ठिकाणी कुठे जागा भाड्याने मिळेल का याबाबत राजगुरूकडे विचारणा केली. राजगुरू हा मूळचा पुण्यातील शिरूर तालुक्यातील राहणारा होता. दरम्यान राजगुरू याने तुषार काळेला रांजणगाव एमआयडीसीमध्ये अशी कंपनी मिळेल असे सांगून मित्र चेतन दंडवते आणि किरण काळे यांच्या मदतीने कंपनीत जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नंतर मिळालेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील तुषार काळेने अंदाजे 132 किलो एमडी बनवला. ही कंपनी अशोक सपकाळ यांची होती. बनवलेल्या 132 किलो एमडी पैकी 112 किलो एमडी तुषार काळे आणि राकेश खानवडेकर यांनी मुंबईत आणून ते जुबीला विकले. या एमडी ड्रग्सच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून तुषार काळेने रांजणगाव येथे मदत करणाऱ्या किरण काळे, अशोक सपकाळ, चेतन दंडवते, अक्षय काळे यांना 67 लाख रुपये दिले.