मुंबई : लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरातील इस्माईल कासम चाळीत राहणाऱ्या वीणा जैन यांची तीन महिन्यांपूर्वी कापून ठेवलेली पाच तुकड्यांमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी काळाचौकी पोलीसांनी वीणा जैन यांची मुलगी रिंपल जैन (24) हिला अटक केली आहे. आज दुसऱ्यांदा तिला रिमांडसाठी शिवडी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने रिंपलला 24 मार्च पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वीणा जैन यांची हत्या केली की, त्या बेशुद्ध असताना अथवा जिवंत असताना कापले याबाबत अद्याप काळाचौकी पोलीसांकडे ठोस पुरावे नाहीत. यासाठी काळाचौकी पोलीस केईएम रुग्णालयातून येणाऱ्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
गुगलवर केले हे सर्च : आईची हत्या करणारी आरोपी रिंपल हिने गुगलवर हाऊ टू डीकंपोज बॉडी हे सर्च केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याचा अर्थ असा की, रिंपलने गुगलवर मृतदेह कसा कुजतो हे सर्च केले होते. त्याचप्रमाणे पसरणारा दुर्गंध रोखण्यासाठी देखील काय काय उपाय आहेत सर्च केले. अद्याप काळाचौकी पोलीसांना रिंपलनेच आईच्या खून करून तुकडे केले का याबाबत खात्री नाही. कारण 27 डिसेंबरला जेव्हा रिंपलची आई वीणा जैन ही पहिल्या मजल्यावरून पडली. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती की मृत अवस्थेत होती. हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण शवविच्छेदन अहवालात वीणा जैन या बेशुद्ध अवस्थेत अथवा जिवंत असताना जर मृतदेहाचे तुकडे केले असेल तर त्याचा रक्तप्रवाह हा वेगळा असतो. तसेच वीणा जैन यांची हत्या करून अथवा मृत अवस्थेत तुकडे केले तर त्याचा रक्तप्रवाह हा वेगळा असतो. हे सर्व विच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार असल्याने काळाचौकी पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. हा अहवाल येण्यास अजून तीन-चार दिवस लागतील असे पोलीस सूत्रांनी सांगितले.