महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरे वा! लालबागचा राजा मंडळाने शोधले 137 प्लाझ्मा दाते, लवकरच केईएममध्ये करणार प्लाझ्मा दान

प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिका, पालिका रुग्णालय आणि खासगी संस्थाही प्रयत्न करत आहेत. त्यात आता लालबागचा राजा मंडळाने आघाडी घेतली आहे. आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून शक्य तितक्या अधिक प्लाझ्मा दात्यांना शोधत त्यांना प्लाझ्मा दान करण्यास लावणे हा उपक्रम सुरू केला आहे.

lalbaugcha-raja
लालबागचा राजा मंडळाने शोधले 137 प्लाझ्मा दाते

By

Published : Jul 13, 2020, 8:28 PM IST

Updated : Jul 13, 2020, 10:36 PM IST

मुंबई :अनेक गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत आहे. मात्र, कोरोनातून बरे झालेले रुग्ण अजूनही म्हणावे तसे प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशावेळी यंदाचा गणेशोत्सव 'आरोग्य उत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या लालबागचा राजा मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मंडळाने 137 प्लाझ्मा दात्यांचा शोध घेत त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार केले आहे. आता 1 ऑगस्टपासून हे दाते परळ येथील केईएम रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहेत. तर, या दात्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात अँटीबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज अर्थात प्लाझ्मा काढून गंभीर रुग्णांच्या शरीरात टाकल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रुग्ण बरे होतात. अशा अनेक प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच आता मुंबईसह राज्यभर प्लाझ्मा सेंटर वाढवण्यात आले आहेत. पण, त्या तुनलेत बरे झालेले कोरोना रुग्ण अर्थात प्लाझ्मा दाते पुढे येताना दिसत नाहीत. आज राज्यात लाखाच्या वर रुग्ण बरे झाले आहेत. तर, मुंबईत 65 हजाराच्या वर रुग्ण बरे झाले आहेत. पण अजूनही प्लाझ्मा दात्यांचा आकडा 500 च्या घरातही गेला नसल्याची माहिती आहे.

प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिका, पालिका रुग्णालय आणि खासगी संस्थाही प्रयत्न करत आहेत. त्यात आता लालबागचा राजा मंडळाने आघाडी घेतली आहे. आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून शक्य तितक्या अधिक प्लाझ्मा दात्यांना शोधत त्यांना प्लाझ्मा दान करण्यास लावणे हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार सध्या बरे झालेल्या रुग्णांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांची नोंदणी करून त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करणे याला मंडळाने वेग दिल्याची माहिती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. आतापर्यंत मंडळाने बरे झालेल्या अनेक रुग्णांशी संपर्क साधला आहे. त्यातून 137 रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करत त्यांची नोंदणी केली आहे. तर, हा शोध पुढेही सुरू राहणार आहे.

केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून मंडळ प्लाझ्मा दान मोहीम राबवणार आहेत. त्यानुसार 1 ऑगस्टला याचा मुहूर्त करत प्रत्यक्ष प्लाझ्मा दान करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल असेही साळवी यांनी सांगितले आहे. दरम्यान लोकांमध्ये अद्याप प्लाझ्मा दानाविषयी जनजागृती नसल्याने वा भीती असल्याने बरे झालेले रुग्ण पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता जनजागृती करणे आणि भीती घालवणे यावर आम्ही काम करत आहोत. तर दुसरीकडे विविध माध्यमातून बरे झालेले रुग्ण शोधत आहोत. त्यामुळे मोठ्या संख्येने दाते येत्या काळात पुढे येतील असेही साळवी यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jul 13, 2020, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details