मुंबई - रविवारी मुंबईतील लालबाग परिसरामध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटासंदर्भात काळाचौकी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. या घडलेल्या स्फोटामध्ये सुशीला बंगेरा (वय 62) व करीम (वय 50) या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. अजूनही जखमींमधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आलेला आहे. या संदर्भात तपास केला जात असताना काळाचौकी पोलिसांनी सदरच्या इमारतीत कॅटरर्स व्यवसाय करणाऱ्या मंगेश राणे व त्यांचा मुलगा यश राणे या दोघांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा -लालबाग साराभाई इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू; 9 जणांची प्रकृती गंभीर
दरम्यान, लालबाग परिसरातील साराभाई इमारतीत गॅस गळती झाली असता, आजूबाजूच्या रहिवाशांनी याची माहिती मंगेश राणे यांना दिली होती. ही माहिती दिल्यानंतर काही मिनिटांतच सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर, पाच जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.
हेही वाचा -लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
काय घडले होते
साराभाई इमारतीचे तळ मजला अधिक चार मजले असे बांधकाम आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या घरात रात्रीपासून गॅस गळतीचा वास येत होता. सकाळी लग्नापूर्वी हळदीचे जेवण बनवण्यासाठी कामगार आणि लग्न घरातील काही लोक आले, त्यांनी गॅस पेटवल्यावर स्फोट होऊन आग लागली. इमारतीमधील काही घरांचेही नुकसान झाले. या दुर्घटनेत इमारतीमधील 16 रहिवासी भाजले आहेत. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन 7 वाजून 50 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.