मुंबई - भायखळा येथील वीर जिजामाता प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग बच्चे कंपनीचे आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. राणीच्या बागेत विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी असल्याने त्यांना पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते. त्यापैकी बिहार येथून आणलेल्या ५४ वर्षीय लक्ष्मी हत्तीणीचे निधन झाले आहे. लक्ष्मीवर प्राणीसंग्रहालय परिसरात दफनविधी करण्यात आला. प्राणी संग्रहालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
राणीच्या बागेतील लक्ष्मी हत्तीणीचे निधन - मुंबई राणी बाग लक्ष्मी हत्तीण न्यूज
मुंबईच्या राणीबागेमध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यांमध्ये दोन हत्तीणींचाही समावेश आहे. यातील लक्ष्मी नावाच्या हत्तीणीचे निधन झाले.
संग्रहालयात नवीन हत्ती नाही -
गेल्या ९ महिन्यांपासून कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने भायखळा येथील विर जिजामाता प्राणीसंग्रहालय आजही पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ नाही. दरम्यान, लक्ष्मीच्या निधनानंतर सध्या याठिकाणी अनारकली ही एकमेव हत्तीण असून तीचेही वय ५४ वर्ष झाले आहे. नियमानुसार प्राणी संग्रहालयात हत्ती ठेवण्यास मनाई आहे. त्यामुळे आता प्राणी संग्रहालयात नवा हत्ती आणता येणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
किती वर्षे जगतो हत्ती -
लक्ष्मी ही हत्तीण १९७७ मध्ये बिहारमधून मुंबईत आणण्यात आली होती. गुरूवारी तीचे निधन झाले. काही दिवसांपासून तीची प्रकृती खालावली होती. जंगलातील हत्ती साधारण ४८ वर्षांपर्यंत जगतो. तर प्राणी संग्रहालयातील हत्ती ६५ वर्षांपर्यंत जगतो. काही वेळा प्राणी संग्रहालयातील हत्ती ८० वर्षापर्यंतही जिवंत राहिल्याची उदाहरणे आहेत.
म्हणून राजकुमारला केरळला पाठवले -
लक्ष्मी आणि अनारकली या दोन्ही हत्तीणींची जोडी राजकुमार या तरुण हत्तीशी जुळवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी राजकुमार १८ वर्षांचा होता तर लक्ष्मी पन्नाशीची आणि अनारकली चाळीशीत होती. त्यामुळे ही जोडी जुळू शकली नाही. त्यानंतर २००७ मध्ये राजकुमारला केरळला पाठवण्यात आले.