मुंबई- पश्चिम रेल्वेवर आज (मंगळवार) महिला प्रवाशांसाठी 'उत्तम' रेक असणारी लोकल चर्चगेट ते विरार मार्गावर धावली. मात्र, उद्यापासून या लोकलचे नियमित 10 फेऱ्या होणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या 69 व्या स्थापना दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्चिम रेल्वेने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. या दिवसाचे निमित्त साधून मंगळवारी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार मार्गावर उत्तम रेक असणारी महिला विशेष लोकल धावली.
उत्तम रेक लोकल चर्चगेटहुन संध्याकाळी 6.15 वाजता सुटून विरारला रात्री 7.57 वाजता पोहचली. मात्र, बुधवारपासून या लोकलमध्ये प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन बदल करण्यात आले आहेत.
सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणारी ही पहिली नॉन एसी लोकल असेल. तसेच नव्या लोकलमधील हँडलचे डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. आपत्कालिनसाठी लोकलमध्ये बटण, विजेची बचत करणारे पंखे आणि एलईडी लाईट्स बसविण्यात आले आहे. तसेच सेकंड क्लासची आसने फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिकपासून (एफपीआर) तयार करण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले.