मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून मुंबई साेडण्यासाठी मजूर प्रवाशांनी रेल्वे स्थानकात ताेबा गर्दी केली आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असली, तरी स्थानकात येणारे लाेंढे वाढतच आहेत. आरक्षित तिकिटांशिवाय प्रवास करता येणार नसला, तरी विशेष गाडीत आपल्याला सीट मिळेल या आशेवर हजाराे प्रवासी लाेकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर टर्मिनसच्या बाहेर उभे आहे. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात श्रमिक मजुरांची गैरसोय सुद्धा होत आहे.
श्रमिकांची अशी आहे आकडेवारी
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन लावला होता. परिणामी, संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली हाती. यामुळे लाखाे स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल झाले. अनंत यातना झेलत घरी पोहचलेले मजूर पुन्हा पोटासाठी शहरात आले. गेल्या वर्षी लॉकडाऊनची घाेषणा हाेताच संपूर्ण राज्यातून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८४४ ट्रेनमधून १८ लाख श्रमिकांनी आपले गाव गाठले हाेते. यापैकी १० लाख मजुरांनी मुंबई साेडली हाेती. जुलै महिन्यापर्यंत मुंबईत ५ लाख नागरिक परत आले हाेते. यातील ४ लाख मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून आले होते. आता पुन्हा कोरोना पाठोपाठ लॉकडाऊनही आला. पण, आता तसे हाल नको म्हणून मजुरांनी घरचा रस्ता धरला आहे.
हेही वाचा -मुंबईत दोन महिन्यात 147 डॉक्टरांना कोरोनाची लागण
राज्यात १ एप्रिल पासून निर्बंध लागू केलेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार १ ते १२ एप्रिल दरम्यान १९६ ट्रेनमधून ४ लाख ३२ हजार ९६३ प्रवासी आसाम, युपी, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालला रवाना झाले. यापैकी १५० ट्रेनमधून ३ लाख २२ हजार ९४४ प्रवाशांनी उत्तर प्रदेश आणि बिहार गाठले आहे. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रेनमधून २ हजार १५२ प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वेवर दरराेज उत्तर आणि पूर्व भारताकरिता २८ ट्रेन चालविण्यात येत आहेत. यामध्ये १८ ट्रेन नियमित, तर १० गाड्या स्पेशल आहेत. एका ट्रेनमधून सरासरी १ हजार ४०० प्रवासी जात आहेत. गेल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेवरून ३ लाख ५० हजार प्रवाशांनी मुंबई साेडली.
श्रमिक ट्रेनची मागणी
मध्य रेल्वेने गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान २७ मे राेजी एका दिवसात ८० श्रमिक ट्रेन चालविल्या हाेत्या. याकरिता राज्य सरकारने प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणले हाेते. मध्य रेल्वेने त्या काळात २० राज्यांसाठी एकूण ४०३ श्रमिक ट्रेनद्वारे सुमारे ६ लाख मजुरांची वाहतूक केली. आता राज्यातून पलायन हाेण्याची तिच स्थिती आहे. परंतु, व्यवस्था मात्र वेगळी आहे. रेल्वे प्रशासन वेटिंग लिस्टनुसार स्पेशल ट्रेनची साेय करीत आहे. तसेच, रेल्वेकडून आवाहन करण्यात येत आहे की, प्रवाशांना स्थानकांवर गर्दी करू नये. ट्रेन सुटण्याच्या ९० मिनिटे आधी रेल्वे स्थानकांवर यावे. रेल्वे प्रशासन वेटिंग लिस्टवर लक्ष ठेवून आहे. आवश्यकता असल्यास अतिरिक्त स्पेशल ट्रेन सोडण्यात येतील. ३० जून पर्यत १५६ स्पेशल ट्रेन चालविणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
आम्हाला गावी जायचे आहे
ईटीव्ही भारतला रेहमान यांनी सांगितले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, शासनाने निर्बंध घातले असून आमचा व्यवसाय ठप्प आहे. मागील दहा दिवसांपासून रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याने आरक्षित तिकीट मिळालेली नाही. आज झारखंड जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढली आहे, मात्र ती सुद्धा प्रतिक्षा यादीत आहे. मुंबईत आमचे अतोनात हाल होत असून कोणत्याही परिस्थितीत गावाकडे जायचे आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षी प्रमाणे आताही श्रमिक ट्रेन चालवावीत.