मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) गेल्या 2 दिवसांपासून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादची चौकशी केली जात होती. या पथकाकडून क्षितिज प्रसादच्या मुंबईतील वर्सोवा, अंधेरी स्थित घरावर छापा सुद्धा मारण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी क्षितिज प्रसादला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. क्षितिज प्रसाद याची चौकशी केल्यानंतर त्यास एनसीबीने अटक केली आहे.
ड्रग्ज प्रकरण : धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित क्षितिज प्रसादला अटक - kshitij prasad arrested by ncb
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसाद यांची चौकशी केल्यानंतर त्यास एनसीबीने अटक केली आहे.
क्षितिज प्रसादच्या चौकशीत त्याने मान्य केले आहे की, त्याचे संबंध अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अंकुश अरेंजासोबत होते. क्षितिज प्रसादच्या मुंबईतील व दिल्लीतील घरी असलेल्या पार्ट्यांत अंकुश अरेंजा सुद्धा हजर राहायचा. एनसीबीने अंकुश अरेंजालाही अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे.
सुशांतसिंह राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थ प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात काही ड्रग्ज पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिले. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांची नावे समोर आली आहेत.