मुंबई: गणपती दिवसात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या पाहता भारतीय रेल्वेकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य- पश्चिम रेल्वे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१२ गणपती विशेष गाड्या चालविणार येत आहे. या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रवाशांना सुविधेसाठी अनेक ट्रेनला अतिरिक्त डबे जोडण्यात येत आहे. मात्र, अशातच कोकण रेल्वेच्या मार्गावर केवळ एक मार्ग असल्याने नियोजित वेळापत्रक पाळणे रेल्वेला अवघड जात आहे. गणपती उत्सव असल्याने एका बाजूला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे नियओजीत गाड्यांना होणारा उशीर त्यामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये संताप दिसून आला.
चाकरमान्यांना १८ तासांचा प्रवास -कोकण रेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे चाकरमन्यांना १८ तासांचा प्रवास होतोय. सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे न वळविल्याने व मालगाडया सुरू ठेवल्याने उशीर, नियोजन बिघडल्याने लोक मुंबईतून ट्रेनने ३०० रुपयात गावाला येतात. स्टेशनला उतरल्यावर एक हजार रुपयाची रिक्षा करून घरी जायचे का ? असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
आरक्षण करून फायदा काय?गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण आम्ही चार महिन्यापूर्वीपासून करून ठेवतोय. आम्ही येवढं करूनसुद्धा गाडीत इतकी गर्दी असते की, आरक्षित स्लीपर कोचमधून आम्हाला चालताही येत नाही. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण करून गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची इतकी गर्दी असते की, आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वे गाड्यातील आसनावरून टॉयलेटमध्ये जाण्यासाठी जागा उरत नाही. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात हीच परिस्थिती असते. रेल्वे मंत्र्यांनी कोकणातील जनतेकडे लक्ष द्यावेत अशी प्रतिक्रिया आरक्षित तिकीटधारक प्रवाशांनी दिली आहे.
दुहेरीकरण करण्याशिवाय पर्याय नाही-कोकणात जाणाऱ्या गाड्यांना केवळ एकेरी मार्ग असल्याने कोकणवासीयांची मागणी असतानाही रेल्वे प्रशासनाला गाड्या सोडता येत नाहीत. सणासुदीच्या दिवसात विशेष गाड्यादेखील उशीरा धावतात. स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे आर्थिक अडचणी येत आहेत. कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी केंद्र शासन व कोंकण रेल्वेशी संबंधित राज्य शासनांकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची माहिती कोकण विकास समिती सदस्य अक्षय महापदी यांनी दिली आहे.