मुंबई: चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या माजी संचालिका होत्या. त्यांचे पती दीपक कोचर देखील उच्च पदावर कार्यरत होते. दीपक कोचर तसेच व्हिडिओकॉन कंपनीचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांच्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रामध्ये धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या व्हिडिओकॉन कंपनी समूहाला दिलेले 1000 कोटी रुपये हे 'नॉन परफॉर्मिंग असेट्स' म्हणजेच बुडीत कर्ज म्हणून दाखवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी निश्चित केलेली आहे. या आरोपपत्राच्या आधारे उद्या उच्च न्यायालय कोणता निर्देश देते, याकडे लक्ष लागून राहिलेले होते; मात्र कोचर दाम्पत्याने स्वतंत्र सूट याचिका दाखल केल्यामुळे त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरील लावलेला आरोप अमान्य केला. तसेच त्यांच्यावर दाखल केलेल्या आरोप पत्राबाबत त्यांना पूर्ण आकलन करून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जावी, म्हणून खटल्यामध्ये मुदत वाढ मागवून मिळण्याची विनंती केली.
बुडीत कर्जासाठी चंदा कोचर जबाबदार:सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून चंदा कोचर आणि पती दीपक कोचर तसेच वेणू गोपाल धूत यांच्यावर आरोप ठेवलेला आहे. या संदर्भात विविध न्यायालयांमध्ये खटला सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याबाबत उद्या सुनावणी होणार आहे. जेव्हा एखाद्या बँक खातेदाराला कर्ज दिले जाते आणि तो दिलेले कर्ज परत देत नाही तेव्हाच त्याला 'नॉन परफॉर्मिंग असेट्स' असे म्हटले जाते. कर्जदाराच्या खात्यामध्ये तो आता ते कर्ज परत करण्याच्या आवाक्याचा बाहेर आहे; म्हणून त्याला बुडीत कर्ज म्हणतात आणि सामान्य जनता त्याला पैसे पाण्यात गेले, असे म्हणतो. याच प्रकारे चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणू गोपाल धूत यांच्यामुळे आयसीआयसीआय बँकेचे 1033 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी आरोप पत्रात नमूद केलेले आहे.