मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी बेस्ट डेकरबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, की मुंबईत सुरू झालेली डबल डेकर बस ही ब्रिटिशांच्या कालखंडाचे प्रतीक आहे. कारण, मुंबईत डबल डेकर बस ही ब्रिटिशांच्या काळातच सुरू झाली. सुरुवातीला ही बस घोड्याच्या साहाय्याने चालवली जायची. त्यानंतर त्यात बदल होत गेले. मग ही बस मशीनवर चालू लागली. हळूहळू शोध लागत गेले पेट्रोल इंजिन आले, डिझेल इंजिन आले, असा हा या डबल डेकर बसचा उत्क्रांती काळ आहे.
मुंबईकरांना सोयीचे वाहन :मुंबईत सुरू झालेली ही डबल डेकर बस हळूहळू मुंबईकरांच्या पसंतीस उतरू लागली. मुंबईत अनेक कंपन्या आल्या, रोजगार वाढला, त्याचबरोबर मुंबईची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढू लागली. अशा या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात दळणवळणासाठी डबल डेकर बस ही अत्यंत सोयीचे साधन होती. मात्र, मुंबई ही इतकी झपाट्याने वाढली की, आता इथे गाड्यांना रस्ते अपुरे पडत आहेत. आजच्या घडीला मुंबईत डबल डेकर बस फक्त कुर्ला आणि सीएसटी भागात पाहायला मिळते.
डबल डेकर कमी का झाली?हा प्रश्न बेस्टचे जनसंपर्क अधिकारी वराडे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, दुमजली बसमध्ये प्रवासी वाहून नेण्याची क्षमता जास्त असते. मात्र, मुंबईचे अरुंद रस्ते लक्षात घेता, ज्या ठिकाणी दुमजली बस चालवणे शक्य आहे. त्या ठिकाणी बेस्ट प्रशासन दुमसली बस चालवत होते. मात्र, हळूहळू इथली लोकसंख्या वाढली आणि रस्ते अधिक निमुळते होऊ लागले. त्यामुळे काही भागातून बस चालवणे कमी कराव लागले. याचे आणखी एक दुसरे कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाच्या आदेशानुसार एखाद्या बसला 15 वर्ष पूर्ण झाली की, ती बस प्रवाशांच्या सेवेत रद्दबातल करून त्या ठिकाणी नवी गाडी ही आणावीच लागते. या दोन कारणास्तव हळूहळू मुंबईत डबल डेकर बस कमी झाली.