मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून अरबी समुद्रात वांद्रे वर्सोवा सागरी सेतू उभारला जात आहे. या 17 किलोमीटर लांब सागरी सेतूच्या उभारणीचे काम 2018 पासून हाती घेण्यात आले आहे. मात्र सध्या या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असून आत्तापर्यंत केवळ 7 टक्केच काम पूर्ण झाले आहे. सध्या वांद्रे ते वर्सोवा हे पार करण्यासाठी दीड तासांचा अवधी लागतो, मात्र या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर हे अंतर केवळ अर्ध्या तासात पूर्ण होणार आहे.
कसा असेल वांद्रे वर्सोवा सागरी सेतू? : वांद्रे वर्सोवा सागरी सेतू हा मुंबईतील दुसरा सागरी सेतू असणार आहे. हा सेतू अंधेरीतील वर्सोवा येथे सुरू होणार असून तो कार्टर रोड जुहू मार्गे वांद्रापर्यंत पोहोचणार आहे. हा पूल वांद्रे ते वरळी या आधीच्या सी-लिंकला जोडला जाणार आहे. हे अंतर सुमारे 17.17 किलोमीटर इतके आहे.
कोणत्या कंपनीला मिळाले पूलाचे कंत्राट? : वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाचे काम आधी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले होते. इटलीच्या एका कंपनीबरोबर रिलायन्स हे काम भागीदारीने पूर्ण करणार होते. मात्र वेळेत काम होऊ न शकल्याने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने यातून माघार घेतली. आता संपूर्ण काम इटलीच्या कंपनीला देण्यात आले आहे. इटलीची ही कंपनी आणखी एका भारतीय कंपनीला सोबत घेऊन या प्रकल्पाचे काम करत आहे.