मुंबई Kishori Pednekar On BMC : महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी सत्ताधारी सरसावले आहेत. मात्र मुंबई महापालिकेची कुठल्याही समितीनं चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. कालपर्यंत तुम्ही सोबत होतात, तेव्हा तुम्हाला घोटाळे दिसले नाहीत का, असा सवाल माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. कसलीही चौकशी करा, आम्ही तयार आहोत, असं प्रति आव्हान मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी :नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना अनेक सदस्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर कॅगनं ठपका ठेवला आहे. त्यामुळं आता चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर नगर विकास विभागाचा प्रभार असलेल्या मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून गेल्या 25 वर्षातील कारभाराची चौकशी होईल, अशी ग्वाही दिली.
कशी असेल चौकशी समिती :मुंबई महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नगर विकास विभाग आणि वित्त विभागाचे संचालक या तीन सदस्यांच्या नियंत्रणाखाली ही समिती काम करणार असून ही समिती पुढील अधिवेशनापूर्वी आपला अहवाल सादर करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. "यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातील दोष आणि उणिवा समोर येतील. मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्यात येईल. श्वेत पत्रिकाही लवकर काढण्यात येईल", असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महापालिकेची चौकशी का झोंबते :विरोधी पक्षांकडून सातत्यानं अन्य महानगरपालिकांच्या चौकशी बाबतीत समिती नेमण्यात यावी, अशी मागणी होत आहे, असं उदय सामंत यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी "मुंबई महानगरपालिकेच्या चौकशीचा विषय निघाल्यानंतर अन्य महानगरपालिकांच्या चौकशीची का मागणी केली जाते, मुंबई महानगरपालिकेची चौकशी का एव्हढी झोंबते? या संदर्भात यथावकाश निर्णय घेतला जाईल", असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.