मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावर मार्ग सूचवला आहे.
डॉ. अजित नवले म्हणाले की, 'साथीच्या काळात लोकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने ताजी फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकार बाजार समित्या बंद करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान तर होणारच आहे. यासोबत शहरी लोकांना ताजी फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या खाण्यास मिळणार नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर होईल.'