मुंबई - संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांनी काल अर्धा तास किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. याबाबत जूनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. तर आज शनिवार (29 ऑक्टोबर)रोजी किरीट सोमैया दादर पोलीस स्टेशनला कागदपत्रांसह पोहोचले होते. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील ६ गाळे (सदनिका) हस्तगत केल्याचा सोमैया यांनी आरोप केलेला आहे. दरम्यान, सोमैया यांच्या या आरोपानंतर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दवाबतंत्राचा वापर केला जात आहे. तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काहीही करायचे का? असा प्रश्न पेडणेकर यांनी केला आहे.
लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले - किशोरी पेडणेकर यांनी २०१७ साली निवडणुकीमध्ये आपल्या शपथपत्रात एसआरएचा पत्ता दिला आहे. इमारत क्रमाक २, वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये राहत असल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिलेले आहे. पेडणेकर यांनी अर्धा डझन गाळे हस्तगत केले आहेत. त्याचा हिशोब घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. आम्ही तुम्हाला गाळे देऊ, असे म्हणत लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले. यासंदर्भातच दादर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरू आहे. मी किशोरी पेडणेकर यांचे नाव दिलेले नाही. तर जे लोक फसलेले आहेत, त्यांनीच पेडणेकर यांचे नाव घेतले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यू मरीन लाईन पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.