महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे मिशन 'सोमय्या' फत्ते; आता लक्ष शेलारांवर - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी त्यावर आता शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांच्या उमेदवारीला विरोध करून शिवसेनेने आपले 'मिशन फत्ते' केले असून आता यापुढे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा नंबर असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे.

उद्धव ठाकरे, किरीट सोमैय्या

By

Published : Apr 3, 2019, 8:31 PM IST

Updated : Apr 3, 2019, 10:38 PM IST

मुंबई- ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी त्यावर आता शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांच्या उमेदवारीला विरोध करून शिवसेनेने आपले 'मिशन फत्ते' केले असून आता यापुढे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा नंबर असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे.

विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत थेट शिवसेना आणि मातोश्रीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. केवळ आरोप करून सोमय्या थांबले नाहीत तर त्यांनी मातोश्रीवरील भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवण्याची भाषा केली होती. शिवसेनेच्या ५० वर्षांच्या राजकीय इतिहासात एवढ्या ठोसपणे कोणत्याही नेत्याने पक्षप्रमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला नव्हता. ही बाब शिवसैनिक तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली होती. याचा सूड घेण्याची भाषा त्याचवेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली. त्यानंतर गेली दोन वर्षे भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. युती तोडण्याचे संकेत अनेक वेळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

मात्र, राजकीय हतबलते पोटी भाजप आणि शिवसेना एकत्र आले खरे. मात्र, खदखद दोन्ही पक्षांच्या मनात होतीच. युतीची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधूनही सोमय्या यांना अपमानित होऊन बाहेर पडावे लागले होते.

युती झाली तरी सोमय्या यांचा विरोध काही मावळला नाही. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी सोमय्या यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ईशान्य मुंबईच्या जागेवरून दोन्ही पक्षात पुन्हा संबंध ताणण्याची स्थिती निर्माण झाली होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा नामांकन अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन युतीत सर्व काही ठीक असल्याचे दाखवले. मात्र, शिवसेनेने सोमय्या यांचा विरोध मागे घेतला नाही. अखेर भाजपच्या केंद्रीय समितीने शिवसेनेची मागणी मान्य करत विद्यमान खासदार सोमय्या यांच्या ऐवजी नगरसेवक मनोज कोटक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. निदान लोकसभेपुरती तरी युती टिकावी, असा निर्धार भाजपने घेतल्याचे दिसत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईचे भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दमदार नेतृत्व केले. शिवसेनेला नाकीनऊ आणत तोडीस तोड जागा मिळवल्या. तसेच शिवसेनेच्या नेतृत्वालाही आव्हान दिले. आकड्यांची गणिते पाहता महापालिकेतून शिवसेनेची सत्ता जाईल की काय? अशी स्थिती निर्माण करण्यात शेलार यांचा सिंहाचा वाटा होता. शेलार यांनी उघडपणे शिवसेनेच्या नेतृत्वावर अनेक सभांमध्ये टीका केली. तसेच सामनामधून होणाऱ्या टीकेलाही सडेतोड उत्तर दिले होते.

आता ज्या प्रमाणे ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय्या यांना विरोध झाला, त्याचप्रमाणे शेलार यांनाही विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत जुजबी उत्तरे दिली जात असली, तरी ऐन निवडणुकीत शिवसेनेचा दबाव आता लपून राहिला नाही.

Last Updated : Apr 3, 2019, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details