मुंबई Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडाली. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी व्हिडिओ प्रक्षेपित करणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि एका युट्यूबरवर गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंड संविधान कलम ५६६, ६६ ई आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ईस्टर्न सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : या वृत्तवाहिनीनं त्यांच्याकडे असे तीन डझन व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना प्रतिक्रिया दिली. 'त्यांनी कोणतीही शहानिशा न करता माझी बदनामी केल्याप्रकरणी मी सायबर पोलिसात वृत्तवाहिनीचे संपादक तसेच युट्यूबर व अन्य काहीजणांविरोधात तक्रार दाखल केली', असं ते म्हणाले. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत ईस्टर्न सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा :Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करा; अंधेरी पोलिसांत तक्रार
पावसाळी अधिवेशनादरम्यान व्हिडिओ समोर आला होता : एका खासगी वृत्तवाहिनीनं काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावरुन विरोधकांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी निदर्शनं झाली. महिला आयोगानंही याची दखल घेत सोमय्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती.
पोलिसांच्या कारवाईकडं सर्वांचं लक्ष : त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याची दखल घेत चौकशी सुरू केली. मात्र या प्रकरणी कथित पीडित महिलेनं समोर येऊन तक्रार दाखल न केल्यानं पोलिसांना तपासासाठी योग्य दिशा सापडत नव्हती. सोमय्या यांनी मात्र बदनामीकारक व्हिडिओ दाखवल्या प्रकरणी खासगी वृत्तवाहिनीच्या मालकासह, संपादक आणि एका युट्यूबर विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस आता यावर पुढं काय कारवाई करतात, याकडं सर्वांच लक्ष लागलंय.
हेही वाचा :Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप