मुंबई Kirit Somaiya on Ravindra Waikar :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलचा घोटाळा केलाय, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केलाय. रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलचा सुमारे 500 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केलाय, असा आरोप करत या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं दिलेली परवानगी नाकारली असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांची प्राथमिक चौकशी करण्यास सुरुवात केलीय. लवकरच त्यातून सत्य बाहेर येईल, असंही सोमैय्या यावेळी म्हणालेत.
भ्रष्टाचार आणि फसवणूक :उच्च न्यायालयात या कारवाई विरोधात रवींद्र वायकर यांनी केलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. वायकर यांना जरी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली असली, तरी यावेळी शेरे देताना न्यायालयानं वायकर यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत. वायकर यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार आणि फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतंय, असं न्यायालयाने म्हटलं आहे, असा दावाही सोमैया यांनी केलाय.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल :दरम्यान रवींद्र वायकर हे खोटं बोलले, त्यांनी फसवणूक केलीय. बनावट कागदपत्रे तयार केली असल्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त यांची आपण भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केलीय, अशी माहिती सोमैया यांनी दिलीय. तसंच वायकर यांच्यावर ताबडतोब एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आपलं बोलणं झालंय. यासंदर्भात कारवाई करायची मागणी आपण केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे भागीदार असलेले रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल, असा दावाही त्यांनी केलाय.