मुंबई - धारावी हे कोरोनाचे मुख्य केंद्र बनले आहे. त्याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. सायन रुग्णालयावर धारावी अवलंबून आहे. पण गेल्या महिनाभरात सायन रुग्णालयातील चार अधिष्ठातांची बदली करण्यात आल्याने हा गलथान कारभाराचा नमुना असल्याची टीका भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. काल महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी वरिष्ठ सनदी अधिकारी इक्बाल चहल यांनी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली. मात्र, सुत्रे हाती घेताच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालिकेची झाडाझडती सुरू केली आहे.
'सायन रुग्णालयातील ४ अधिष्ठातांची बदली करणे म्हणजे स्वत:चे अपयश लपवणे'
डॉ. मोहन जोशी यांची नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी या पूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी जोशी यांनी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले होते. अधिकाऱ्यांची अदलाबदली सरकार स्वत:चे अपयश लपवण्यासाठी करत आहे, असा आरोपही सोमैया यांनी केला.
चहल यांनी सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांची सायन रुग्णालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी भारमल यांना तातडीने सायन रुग्णालयाचा चार्ज स्वीकारण्याचे आदेश दिले होते.
सायन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा सुरू आहे. त्यांना योग्य सोयीसुविधा मिळत नाहीत अशी रुग्णांची तक्रार आहे. त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता सक्षम नसल्यामुळे हे होत आहे, असा आरोप विरोधी पक्ष करत होते. त्यात आता चार वेळा बदली झाल्याने सरकार सक्षम नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. तडकाफडकी बदली केलेल्या सायन रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांना त्यांच्या जुन्या विभागात पाठवून देण्यात आले आहे. तसेच डॉ. भारमल यांच्यावर कुपर रुग्णालय आणि एच. बी. टी. मेडिकल कॉलेज यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात दिली आहे. डॉ. मोहन जोशी यांची नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी या पूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी जोशी यांनी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले होते. अधिकाऱ्यांची अदलाबदली सरकार स्वत: चे अपयश लपवण्यासाठी करत आहे, असा आरोपही सोमैया यांनी केला.