मुंबई - मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा आणल्यानंतर आता महाराष्ट्रातही या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी भाजपाने केली आहे. मात्र, लव्ह जिहाद कायद्याची गरज नसल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेत्यानी म्हटले आहे. यावरून शिवसेनेचा भगवा रंग बदलत चालला आहे, अशी टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
किरीट सोमैया यांची शिवसेनेवर टीका 10 सप्टेंबर 2014चा अंकात "सामना" वर्तमानपत्रात म्हटले होते, की लव्ह जिहाद समाजासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना लव्ह जिहादवर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. पण आता "लव्ह जिहाद"मध्ये काहीच गैर नाही, असे 21 नोव्हेंबर 2020च्या सामनामध्ये म्हटले आहे, अशी टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
भाजप राजकारण करत आहे -
लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
लोकांना भरडले जाऊ नये -
अल्पवयीन मुलींवर दबाव आणून किंवा फूस लावून धर्म बदलण्यासाठी भाग पाडले जाते. मुलींना पळवणाऱ्या टोळ्या हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. अनेकदा अतिरेकी विचारासाठी या अल्पवयीन मुलींचा उपयोग केला जातो व त्यांचा थांगपत्ताही लागत नाही. अठरा वर्षांच्या वरच्या वयोगटातील मुलगी व एकवीस वयाच्यावरील मुलगा अशा असणाऱ्या दोन व्यक्ती हे स्वत:च्या इच्छेनुसार कुठल्याही जातीत व कुठल्याही धर्मात लग्न करू शकतात, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. अल्पवयीन मुलींच्या हिताच्या भूमिकेतून व धर्मांतरासाठी केली जाणारी सक्ती या चौकटीमधून हा विषय पाहिला जावा, असे वाटते. म्हणून या प्रकरणात सामान्य लोक भरडली जाऊ नये हे लक्षात ठेवावे, असेही त्या म्हणाल्या.